अलिबाग तालुक्यातील अनेक गावे 16 तास विजेविना

सागाव फिडरचा वीजपुरवठा 16 तासांनी सुरळीत!
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी रात्री मुसळधार पावसाने सुरुवात केली होती. पडत असलेल्या मुसळधार पावसासोबत वीजाही चमकत होत्या. अलिबाग तालुक्यातील सागाव फिडरवर वाडगाव येथील इन्सुलेटरवर वीज पडून रात्री साडे नऊ वाजता वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पाच हजार ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागली असून आज 22 सप्टेंबर रोजी 16 तासाने वीज पुरवठा सुरळीत करण्यास महावितरण कर्मचार्‍यांना यश आले आहे. महावितरण कर्मचार्‍यांकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पावसात मेहनत घेत होते.
अलिबाग तालुक्यातील सागाव फिडरवर साधारण पाच हजार ग्राहक महावितरणची सेवा घेत आहेत. 21 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे या फिडरचा वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांना फटका बसला. महावितरण कर्मचारी हे भर पावसात मध्यरात्री वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, राऊत वाडी ते वाडगाव दरम्यान झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करताना मुसळधार पाऊस, अंधार आणि वाढलेले मोठे गवत यामुळे अडचण निर्माण झाली होती.
त्यामुळे पुन्हा सकाळपासून महावितरण कर्मचार्‍यांनी दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. अखेर 16 तासाने तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला. वीज पडल्याने हा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे कनिष्ठ अभियंता एन बागडे यांनी म्हटले आहे. महावितरणचे अलिबाग कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, सहाय्यक अभियंता इनामदार, एन आर बागडे, महावितरण कर्मचारी यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेतली.

Exit mobile version