येत्या 9 जूनपासून सुरू होणार
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील पर्यटनप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन लवकरच सुरु होणार आहे. ही मराठा पर्यटन ट्रेन येत्या 9 जूनपासून सुरू होत आहे. रायगड, शिवनेरी, पन्हाळा, प्रतापगड सोबतच सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांनाही या ट्रेनच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. तसेच, कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई आणि पन्हाळगडासह राज्यातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थानांचे दर्शन आता घेता येणार आहे.
‘आयआरसीटीसी’द्वारा संचालित भारत गौरव टुरिस्ट ट्रेन ही विशेष मराठा पर्यटन उपक्रमांतर्गत मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा लाभ देशभरातील रेल्वे प्रवाशांना घेता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना शिव-जन्मस्थळ आणि शिवरायांचे किल्ले आणि विजयी मोहिमांशी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळणार आहे. या अनोख्या प्रवासासाठी पर्यटकांना विशेष यात्रा पॅकेजही मिळणार आहे. ही गाडी रायगड ते पन्हाळगडपर्यंत धावणार असून येत्या 9 जूनपासून सुरू होणार आहे. या विशेष ट्रेनने महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचा, सांस्कृतिक ठेव्यांचा आणि धार्मिक स्थळांचा प्रवास करणे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल यात शंकाच नाही.
’या’ गडकिल्यांचा असणार समावेश
गडकिल्ल्यांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन हि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स तसेच दादर आणि ठाणे स्थानकावरून 9 जूनला सुटणार आहे. यामध्ये किल्ले रायगड, पुणे परिसरातील लाल महाल, कसबा गणेश मंदिर, शिवसृष्टी, किल्ले शिवनेरी, भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग मंदिर, किल्ले प्रतापगड, कोल्हापूरची अंबाबाई मंदिर आणि किल्ले पन्हाळगड या स्थळांचा समावेश आहे.
पर्यटनप्रेमींसाठी विशेष यात्रा पॅकेज
गडकिल्ले पर्यटन ट्रेनचा प्रवास सहा दिवसांचा असणार आहे. मराठा पर्यटन ट्रेन यात्रेच्या अंतर्गत, पर्यटनप्रेमींना एक विशेष यात्रा पॅकेजदेखील दिले जाणार आहे, ज्यात स्लीपर, एसी तृतीय श्रेणी, एसी द्वितीय श्रेणीतून प्रवासाची सोय, निवास, भोजन, तसेच स्थानिक मार्गदर्शकांची सेवा उपलब्ध असेल. या पॅकेजमध्ये विविध किल्ल्यांची आणि तीर्थस्थळांची सुसंगत माहिती दिली जाईल, ज्यामुळे पर्यटकांना एक संपूर्ण ऐतिहासिक अनुभव मिळेल.