। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील महाजने येथील श्रमिका पाटीलने खेलो इंडिया युवा खेळ अंतर्गत क्रीडा स्पर्धेत रुपेरी यश मिळविले आहे. तिच्या या कामगिरीने अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाबद्दल शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि.13) विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम शेतकरी भवन येथील सभागृहात पार पडला.
खेलो इंडिया अंतर्गत झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नुकत्यात गया येथे पार पडली. ही स्पर्धा भारत सरकारद्वारे आयोजित केली जाणारी एक राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आहे. शाळेसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील खेळाबाबतची प्रतिभा ओळखणे, त्यांना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपिठ मिळवून देण्याबरोबरच क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचा प्रयत्नातून करण्यात आला. यावेळी गतका मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात श्रमिकाने उत्तम कामगिरी बजावत रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेत पदक मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू असल्याचा बहूमान तिने मिळविला आहे. मंगळवारी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील व जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रमिकाचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रामराजचे माजी सरपंच मोहन धुमाळ, सुडकोलीचे माजी सरपंच जयवंत तांबडकर, श्रीधर पाटील, श्रध्दा पाटील व सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.