। अलिबाग । प्रतिनिधी ।
अंधश्रध्देला खतपाणी घालणार्या मांत्रिकाला रेवदंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईने मांत्रिक व बुवाबाजी करणार्यांना चपराक बसली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना खलिक रझा अन्सारी असे या मांत्रिकाचे नाव असून तो कल्याण येथील रहिवासी आहे. नवी मुंबई दारवे येथील अखलाक आयुब खान याने त्याच्या मुलीचे प्रेम तोडण्यासाठी या मांत्रिकाचा आधार घेतला होता. त्याच्या सांगण्यावरून खान याने रविवारी सकाळी ताडगाव येथील विहीरीत मंतरलेली वीट आणि जडीबुटी टाकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले. मात्र, खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करून रेवदंडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने मांत्रिकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.