। अलिबाग । प्रतिनिधी ।
आमदाराच्या चालकाने अलिबाग तालुक्यातील एका विवाहित महिलेचा विनयभंग केला. ही घटना घडून चार दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात आली नाही. परिणामी, आमदारांच्या दबावामुळे पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक महिलांकडून करण्यात आला असून लाडक्या बहिणीचा नारा देत मतं मिळविणार्या सत्तेतील आमदारांकडूनच आरोपींना अभय दिले जात असल्याचा आरोपीही लाडक्या बहिणींना केला आहे. शेकाप जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पिडीत महिलेच्या कुटूंबियांची मंगळवारी भेट घेतली. त्यावेळी स्थानिक महिलांनी चित्रलेखा पाटील यांच्यापुढे आपली व्यथा मांडली.
अलिबाग तालुक्यातील 36 वर्षीय महिला शनिवारी रात्री एकटी होती. त्यावेळी आमदार दळवींचा चालक प्रसाद भगत याने त्या संधीचा फायदा घेत घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटून गेले. मात्र, अद्यापही आरोपीविरोधात पोलिसांनी कारवाई केली नाही. पोलिसांच्या या भुमिकेबाबत तेथील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महिलांवरील अत्याचार्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. अलिबागमधील महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत पोलिसांना गांभीर्य नसल्याचा आरोप महिलांकडून केला जात आहे. तसेच पोलीस नेमकं काय करतात, आमदार दळवी यांच्या वरदहस्तामुळेच गुन्हेगारांना अभय दिले जात असल्याचा आरोप महिला वर्गाकडून केला जात आहे.
जनतेची सेवा करण्यासाठी ज्यांना निवडून दिले. तेच आमदार महिलांच्या सुरक्षेबाबत का दुर्लक्ष करीत आहेत. अत्याचार करणार्यांना पाठीशी का घालत आहे, अशा अनेक प्रकारची संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गात उमटत आहे. याशिवाय महिलेचा विनयभंग करणार्या प्रसाद भगत याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा महिला एकत्र येऊन आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
मानसी दळवींच्या वक्तव्याने महिलांमध्ये संताप
आमदार महेंद्र दळवी यांच्या चालकाने एका विवाहीत महिलेला मागून मिठी मारून तिला मारहाण केली. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. फक्त मिठी मारली ना, रेप नाही ना केला, असे निंदनीय वक्तव्य जिल्हा परिषदेच्या माजी विरोधी पक्षनेत्या मानसी दळवी यांनी केल्याचा आरोप तेथील महिलांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्याबाबत महिलांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पिडित महिलेला न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.
…अन्यथा रस्त्यावर उतरु
चित्रलेखा पाटील
सरकार एका बाजूला लाडकी बहिण योजना राबवून महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत स्थानिक आमदारांमध्ये गांभीर्य दिसत नाही. अलिबागमधील महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत आरोपीविरोधात ठोस कारवाई करण्यात दिरंगाई झाल्यास खपवून घेणार नाही. कोणताही दबाब न घेता पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा महिलांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू, अशी आक्रमक भुमिका चित्रलेखा पाटील यांनी मांडली.