सिडको, खारलँडने निधी द्यावा; चिरनेरवासियांची मागणी
| उरण | प्रतिनिधी |
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्या हुतात्म्यांच्या चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणार्या पूरपरिस्थितीचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत आहे. तरी, या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी चिरनेर गावातील नाल्याच्या साफसफाईसाठी सिडकोने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच गाळात रुतलेल्या खाडीतील गाळ काढण्यासाठी खारलँड विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी चिरनेरकरांनी केली आहे.
चिरनेर गावाच्या विकासासाठी सिडकोने कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून न देता उलट पावसाळ्यात भरुन वाहणार्या नाल्यातून नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी हेटवणे धरणातून येणारी जलवाहिनी टाकण्याचे काम केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या जलवाहिनीमुळे नाल्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन केरकचरा, गाळ आडून पावसाळ्यात पूरपरिस्थितीचा धोका निर्माण होत आहे. त्यात नाल्यात केरकचरा साचल्याने रहिवाशांना मच्छरांबरोबर दुर्गंधीचा सामना हा सातत्याने सहन करावा लागत आहे. तसेच नाल्याव्दारे खाडीच्या पात्रात दरवर्षी डोंगर माथ्यावरुन वाहात येणारी माती, मुरूम हे साचून राहात असल्याने खाडीचे पात्र वर-वर आल्याने पावसाचे व समुद्रातील भरतीचे पाणी हे भातशेतीबरोबर गाव परिसरात साचून राहात आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूरपरिस्थितीची समस्या वारंवार निर्माण होत आहे.
तरी, चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणार्या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी चिरनेर गावातील नाल्याच्या साफसफाईसाठी सिडकोने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच गाळात रुतलेल्या खाडीतील गाळ काढण्यासाठी खारलँड विभागाने, आपत्ती व्यवस्थापनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी चिरनेर गावातील रहिवासी करत आहेत.