| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकविणे अनिवार्य करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी विधानसभेत केली. मराठी विषय शिकविणे टाळणाऱ्या किंवा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काही शाळांमध्ये मराठी विषय ऐच्छिक ठेवला जात असून, अनेक विद्यार्थ्यांना मराठी शिकविली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्य सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांनी हा नियम पाळणे बंधनकारक राहील. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांविरोधात आवश्यक ती प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही दादा भुसे यांनी सभागृहात स्पष्ट केले.
पहिली ते दहावीपर्यंत मराठी अनिवार्य
