| चिरनेर | प्रतिनिधी |
नवीन पनवेल खांदा कॉलनी येथील सिकेटी सिनियर कॉलेज, पनवेल येथील बार असोसिएशन आणि रेऑन स्कूल खांदा कॉलनी नवीन पनवेल येथे, ज्येष्ठ साहित्यिक अँड. चंद्रकांत मढवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या मराठी राजभाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक तथा अँड. चंद्रकांत मढवी यांचे अधिवक्ता म्हणून व्याख्यान ठेवण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी भूषविले होते. तर व्यासपीठावर प्रा. कांबळे तसेच अन्य प्राध्यापक व वकील मंडळी उपस्थित होती.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत मढवी यांनी मराठी भाषेचे संवर्धन करावयाचे असेल तर आपल्या बोलीचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. तर सामाजिक व्यवहारातून भाषा व्यापक बनते. रूढी परंपरा आणि धार्मिकतेतून आपल्या खऱ्या भाषेची ओळख होते. मराठी भाषेत संस्कार आहेत. मोठी ताकद आहे. त्यामुळे तिची नक्कल न करता, पावित्र्य राखले गेले पाहिजे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत मढवी यांच्या हस्ते भित्तिपत्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पारितोषिकेही देण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे सादरीकरण केले. तर काही विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता, कथा नाट्य अभिनय आणि विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून, नृत्याविष्काराचे सादरीकरण केले.







