| माणगाव | प्रतिनिधी |
तालुक्यातील छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालय व अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांताच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन (दि.27) माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव सखाराम जाधव व शिक्षक वृंद यांच्या हस्ते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव गीते सादर करुन मराठी भाषेतील साहित्य व परंपरा यांचे सादरीकरण केलें. विद्यार्थ्यांनी वेशभूषा सादरीकरण करून मराठी साहित्यातील विविध नामवंत लेखक , कवी यांची माहिती व जीवन परिचय करून दिला.
या निमित्ताने विद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटात निबंध स्पर्धा घेण्यात आली. माझी मातृभाषा व माझी माय मराठी आहे महान या विषयावर 77 विद्यार्थ्यांनी निबंध लेखन केले. या स्पर्धेत लहान गटात कुमारी संजीवनी साळवी प्रथम क्रमांक, कुमारी आस्था कोंडे द्वितीय क्रमांक, कुमारी आर्या पालकर तृतीय क्रमांक तर मोठ्या गटात मानसी सुतार प्रथम क्रमांक, नियती शिर्के द्वितीय क्रमांक व आदिती कसबले तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्या हस्ते निबंधातील विजयी स्पर्धकांना बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले. सांस्कृतीक प्रमूख शिक्षक अजित शेडगे यांच्या नियोजनातून अत्यंत उत्साही वातावरणात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थी प्रेम म्हस्के याने केले तर प्रास्ताविक पियूष वाळगुडे तर आभार प्रदर्शन आनुष कसबले याने केले. या कार्यक्रमास अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष दुर्गेश सोनार उपाध्यक्षा अरुंधती जोशी, प्रवीण देशमुख आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.