| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या शिष्टाईमुळे सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात गुरुवारी (दि.3) पनवेल येथून मंत्रालयावर निघालेला पायी मोर्चा स्थगित करण्यात आला. शुक्रवारी (दि.4) हा मोर्चा मंत्रालयावर धडाकणार होता. सिडकोचा नैना प्रकल्प राबवण्याकरिता पनवेलमधील 23 गावांतील जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. मात्र, जमिनी संपादित करण्यासाठी लादण्यात आलेल्या अटी-शर्ती मान्य नसल्याने प्रकल्प बाधित ग्रामस्थ आक्रमक झाले असून, महाविकास आघाडीतील मित्र पक्षाच्या वतीने मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात आला होता.
शेकाप, महाविकास आघाडी, नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती यांच्यातर्फे नैनाविरोधात काढण्यात आलेला मोर्चा गुरुवारी दुपारी खारघरपर्यंत गेल्यानंतर शासनाकडून शिष्टमंडळाला मंत्रालयात बोलवण्यात आले. तोपर्यंत मोर्चा सानपाड्यापर्यंत नेण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळ मंत्रालयात गेले. यावेळी नैनाचे शिष्टमंडळ आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यात चर्चा झाली. यावेळी शिष्टमंडळाने नैना नकोच अशी भूमिका घेतली व नैना शेतकऱ्यांसाठी किती जाचक आहे हे सांगितले. यावेळी उदय सामंत यांनी दहा ते बारा दिवसांत सिडको, पालकमंत्री आणि नैनाचे शिष्टमंडळ यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर या बैठकीत होणारी माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन त्यांच्यासोबत नैनाच्या शिष्टमंडळाची बैठक लावणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले असल्याची माहिती माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली. यावेळी काढण्यात आलेला मोर्चा स्थगित करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.