हजारो बालकांची मोफत तपासणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत राबविला जाणारा राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यातील हजारो बालके आणि विद्यार्थ्यांना नवजीवन देणारा ठरला आहे. एप्रिल ते जूनदरम्यान तपासणी केलेल्या हजारो बालकांमधील 52 जणांवर हृदयरोग शस्त्रक्रिया व उर्वरित बालकांवर इतर आजारांशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामुळे बालकांना नवजीवन मिळाले असून, पालकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
शून्य ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करून त्यामध्ये आढळणाऱ्या समस्या, जन्मता असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि अपंगत्व अशा अनेक आजारांचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत. जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील शून्य ते 6 वयोगटातील बालकांची तपासणी वर्षातून दोन वेळा केली जाते. पहिली तपासणी एप्रिल ते सप्टेंबर व दुसरी तपासणी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत होते. तसेच शासकीय व निमशासकीय शाळेतील 7 ते 18 वयोगटातील मुलांची तपासणी वर्षातून एकदा होते. या तपासणीसाठी एकूण 30 पथकं तयार केली आहेत. प्रत्येक पथकामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, औषध निर्माता अशा एकूण चार जणांचा सहभाग आहे. नियोजन केलेल्या कार्यक्रमानुसार पथक अंगणवाडी, शाळांमध्ये जाऊन बालकांसह शाळेतील मुलांच्या आरोग्याची तपासणी करतात. या तपासणीत एखाद्या आजाराचे निदान झाल्यावर तातडीने त्यावर उपचार अथवा यशस्वी शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी लागणारा सर्व खर्च शासनाकडून केला जातो.
हजारो बालकांची तपासणी
रायगड जिल्ह्यात एप्रिल ते जून या कालावधीत एक हजार 614 अंगणवाड्यांमधील 76 हजार 571 बालकांची तपासणी करण्यात आली आहे.त्यामध्ये 523 बालकांना आजाराचे लक्षणे दिसून आल्याने त्यांना बालरोग तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील 38 शाळांमधील पाच हजार 37 विद्यार्थ्यांची तपासणी केली आहे. त्यामध्ये 251 विद्यार्थ्यांना उपचारासाठी वैद्यकिय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे.
यशस्वी शस्त्रक्रिया
52 विद्यार्थ्यांना हृदयविकार, हरणीया, अस्पष्ट बोलणे, डोळ्यांचा तिरळेपणा असे अनेक आजार असल्याचे निष्पन्न झाले. हृदयविकाराच्या आजारासह ऐकू न येणाऱ्यांची संख्या त्यामध्ये अधिक असल्याचे दिसून आले आहे. या 52 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामध्ये अंगणवाडीमधील 8 व 16 व शासकीय व निमशासकीय शाळेतील दोन अशा एकूण दहा विद्यार्थ्यांवर हृदयविकारावर शस्त्रकिया केली आहे. तर अंगणवाडीमधील 27 व शाळांमधील 15 अशा एकूण 42 विद्यार्थ्यांवर हरणीया, अस्पष्ट बोलणे अशा आजारांवर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती एनआरएचएम विभागाकडून देण्यात आली.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एनआरएचएम विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली आहे. निदान झालेल्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करुन त्यांना नवजीवन देण्यात आले आहे.
श्री. देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय