| शिहू | वार्ताहर |
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व यंगस्टार सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ कुर्डुसच्या वतीने कै. नथुराम चांगु शेरमकर क्रीडा नगरीत भाजप चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मरीदेवी धेरंड संघाने चौंडेश्री कडसुरे संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग दर्शवला होता. दरम्यान, मरीदेवी धेरंड विरुद्ध चौंडेश्वरी कडसुरे यांच्यातील अटीतटीच्या लढतीमध्ये मरीदेवी धेरंड संघाने सात गुणांनी मात करून प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना 31000 रुपये व आकर्षण चषक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक चौडेश्वरी कडसुरे 21000 रुपये व चषक, तृतीय टीबीएम कारावी, व चतुर्थ हनुमान उचेडे संघाला 11000 रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू ऋतिक पाटील, उत्कृष्ट चढाई जयेश गावंड, तर शिस्तबद्ध संघ म्हणून जयगणेश वाशी रोहा संघाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी यंगस्टार सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अनंत पाटील, उपाध्यक्ष प्रदीप म्हात्रे व सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.