। मुंबई । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सलग कारवाई करत तब्बल 34.20 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. वेगवेगळ्या तीन प्रकरणांत एकूण पाच प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 6 ते 7 ऑक्टोबर दरम्यान मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. सध्या हे पाचही आरोपी सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात असून, त्यांची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फुकेतहून विमानाने आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतून 6.377 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. या मालाची अंदाजे किंमत 6.377 कोटी आहे. दुसरी कारवाई: बँकॉकहून विमानाने आलेल्या एका प्रवाशाकडून 17.862 किलो गांजा सापडला. या मालाची किंमत 17.862 कोटी एवढी आहे. तिसरी कारवाई: फुकेतहून विमानाने आलेल्या तिघा प्रवाशांकडून 9.967 किलो गांजा जप्त झाला. या मालाची किंमत 9.967 कोटी आहे. सर्व प्रकरणांमध्ये हायड्रोपोनिक गांजा प्रवाशांच्या चेक-इन ट्रॉली बॅगेमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. सीमाशुल्क अधिकार्यांनी सर्व प्रवाशांना अटक करून गुन्हा नोंदविला आहे. सीमाशुल्क विभागाच्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर हायड्रोपोनिक गांजाच्या तस्करीला मोठा धक्का बसला असून, पुढील तपास सुरू आहे.







