। उरण । प्रतिनिधी ।
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, वीर वाजेकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय फुंडे व उरण एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय उरण, यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सागर स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण सागर किनारा परिसर स्वच्छ केला. किनाऱ्यावर असलेल्या कॅरीबॅग, पाणी बॉटल्स, इतर केरकचरा विद्यार्थ्यांनी जमा केला व नागाव ग्रामपंचायतकडे सुपूर्द केला. एकूण जवळपास 3000 किलो कचरा विद्यार्थ्यांनी यावेळी जमा करून स्वच्छतेचा संदेश व पर्यावरण रक्षणाचा संदेश समाजाला देण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत सागर सीमा मंच रायगड विभाग, नागरी संरक्षण दल, उरण यांनीही सहभाग नोंदवला व स्वच्छता अभियानात मोलाचे कार्य केले. विद्यार्थ्यांच्या मनात स्वच्छतेची जाणीव निर्माण व्हावी व सागर किनारा स्वच्छतेचे महत्व समजावे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे, प्रा. डॉ.राम गोसावी, प्रा. रेश्मा बंगारे, प्रा. दिपु यादव आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.







