वस्तूंच्या किंमतीमध्ये दहा टक्केने वाढ
| रायगड | प्रमोद जाधव |
गणरायाचे आगमन आता चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. सजावटीसह पुजेच्या साहित्यांनी जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. खरेदीची लगबग वाढली आहे. मात्र, वेगवेगळ्या साहित्यांच्या किंमतीमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे वस्तु खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजण्याची वेळ भक्तांवर आली आहे. महागाईची झळ असताना त्याकडे दुर्लक्ष करीत भक्तांचा खरेदीचा उत्साह वाढला असल्याचे दिसून आले.
गणरायाचे आगमन14 सप्टेंबरला घरोघरी होणार आहे. घरगुतीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणेशमुर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सजल्या आहेत. अलिबाग, पेण, पनवेल, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड यांसह जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्येही सजावटीच्या साहित्याची मोठी उलाढाल सुरू झाली आहे. शहरातील मोठ्या दुकानांबरोबरच गावागावातील छोट्या दुकानदारांनी ही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध झाले आहेत. लहान मोठ्या बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या वस्तू खरेदीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. दहीहंडीचा सण झाल्यावर गणेशोत्सवाच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. फुलमाळ, वेलवेट तोरण, रुमाल, मोती माळ, मोती या साहित्यांसह वेगवेगळ्या तयार वस्तूंना सजावटीसाठी पसंती दर्शविली आहे. आकर्षक सजावट करण्यासाठी यावर्षीदेखील अनेकांनी पर्यावरण पुरक वस्तूंना भर दिला आहे. कागदी मखरांसह तयार मखरलाही मागणी वाढली आहे.
कागद, बांबू, कापड आणि नैसर्गिक वस्तूंचा वापर करून सजावट करणे, फुलांची आरास करणे याकडे अनेकांचा कल आहे.विशेष म्हणजे, यंदा नवीन उपक्रमावर आधारित घरगुती सजावटीकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसून येत आहे. कोकणी संस्कृती, वारली कला, ग्रामीण जीवन, मंदिराची प्रतिकृती, फुलांची आरास अशा वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित सजावटीचे साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कमी जागेतही आकर्षक सजावट करण्याचा प्रयत्न गणेशभक्तांकडून करण्यात आला आहे. पारंपरिक सजावटीसोबतच आकर्षक लाईटिंग, आर्टिफिशियल फुले, रेडिमेड बॅकड्रॉप, तोरणे, पडदे, मोत्यांच्या माळा आदी वस्तूंच्या बाजारात वेगवेगळ्या वस्तू दाखल झाल्या असल्या तरी जिल्ह्यातील भक्तांना यंदाही महागाईची झळ बसली आहे. वेगवेगळ्या वस्तूंमागे दहा टक्केने वाढ झाली आहे. या महागाईमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र बाप्पाच्या स्वागतासाठी याकडे दुर्लक्ष करीत भक्तांचा खरेदीचा उत्साह कायमच असल्याचे दिसून आले.
अनेकांना रोजगारांची संधी
गणेशोत्सवाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यामध्ये सजावटीसह पुजेच्या साहित्यांसाठी वेगवेगळी दुकाने उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील गाव पातळीवरील लहान मोठ्या बाजारपेठांसह शहरी भागातील बाजार पेठांमध्ये नाक्यानाक्यावर वेगवेगळ्या वस्तूंची दुकाने सजली आहे. अगरबत्ती, मेणबत्तीसह पुजेचे लागणारे अन्य साहित्य, रेडीमेड फुले, माळा अशा अनेक वस्तूंची दुकाने आहेत. तसेच बाप्पाच्या स्वागतासाठी घराची साफ सफाई करण्यापासून रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अनेकांना रोजगाराचे संधी या कालावधीत उपलब्ध झाल्याचे चित्र आहे. साहित्य विक्रेते आणि लहान व्यावसायिकांनाही रोजगाराची संधी मिळत आहे.गणेशोत्सवाच्या काही दिवसांमध्ये या साहित्याची विक्री वाढत असल्याने छोट्या व्यावसायिकांसाठी हा महत्त्वाचा हंगाम ठरत आहे.
