| रोहा | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर रोह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली. या हकेला येथील व्यापारी मंडळ व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजरपेठ बंद करुन अजितदादांना आदरांजली अर्पण केली.
राज्याचे कर्तृत्वान व जनतेच्या मनात आढळ स्थान असलेले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात काम करत असताना अजितदादांचे रोह्याशी व विशेषतः रायगडकरांशी खूप जिव्हाळ्याचे व अतूट स्नेहसंबंध होते. मंत्रीमंडळात असताना दादांनी रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करोडो रुपयांचा निधी दिला आहे. कार्यकर्त्यांना बळ देणारे,पक्ष हितासाठी झटणारे अजितदादा आज आपल्यातून गेल्याची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला. नगराध्यक्षा कु.वनश्री शेडगे यांच्या समवेत शहर अध्यक्ष अमित उकडे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, गट नेते महेंद्र गुजर सर्व विषय समितीचे सभापती नगरसेवक मंडळी व कार्यकर्त्यांनी रोहे बाजार पेठेत फेरफटका मारून व्यापाऱ्यांना बाजरपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले. सर्व व्यापारी बांधवांनी आवाहनाला प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेऊन दादांना श्रद्धांजली अर्पण केली. या दरम्यान शहारात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठीक ठिकाणी कटेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण भागात मंत्री अदिती तटकरे व माजी आ.अनिकेत तटकरे यांच्या नियोजित सभा व गावं बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.
