बाजारपेठा सजल्या बाप्पाच्या साहित्यांनी

। उरण । वार्ताहर ।

लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला आहे. सर्वच ठिकाणी आरास सजावटीची जोरदार तयारी सुरू आहे. मनातील कल्पनाशक्तीला वाव देऊन वेगवेगळ्या पद्धतीची आरास करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. अशात बाजारात सध्या आर्टिफिशिअल फुलांच्या माळा विक्रीसाठी आल्या असून उरणच्या बाजारांपेठामध्ये अशा विविध रंगांतील फुलांच्या हुबेहूब वाटणाऱ्या माळा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

शहरातील अनेक नाक्यावर तसेच गावांच्या वेशीवर आर्टिफिशियल फुलांच्या माळा घेऊन विक्रीस बसलेले नजरेस पडतात. या माळांमध्ये वापरलेले रंग आणि त्याची बनावट पाहताच क्षणी ग्राहकांना भुरळ पाडत आहे. या ठिकाणी झेंडूच्या माळा, जास्वंद फुलांच्या माळा, दारावर लावण्यासाठी आंब्याचे, झेंडूचे, चमेली आणि लिली फुलांचे गुलदस्ते, फुलदाणीमध्ये ठेवण्यासाठी विविध परदेशांतील फुलांचे प्रकार अशा नाना तऱ्हेची रंगीत फुले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या फुलांकडे पाहिल्यास खरेदीसाठी नागरिक थांबलेले दिसून येत आहेत.विक्रीसाठी ठेवलेल्या फुलांपैकी झेंडूच्या फुलांना अधिक मागणी आहे. फुटांप्रमाणे या माळांची किंमत ठरवलेली आहे. अगदी तीन फुटांच्या माळांपासून 1 ते 5 फुटांच्या माळांपर्यंत झेंडूचे हार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तीन फुटांच्या तोरण अथवा हारासाठी शंभर रुपयांपासून सुरुवात होते.

Exit mobile version