छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पती, सासूविरोधात गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |

तालुक्यातील चिध्रण गावात राहणार्‍या अस्मिता (24) या विवाहतेचा तिच्या सासरकडील मंडळींनी हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करुन तिला क्रूरपणे वागणूक दिल्याने अस्मिताने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवले तालुका पोलिसांनी मृत विवाहितेचा पती शरद नामदेव पाटील (32), सासू आनंदी पाटील (65) या दोघांविरोधात हुंडाबळीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पतीला अटक केली आहे.

मृत अस्मिता हिचा पनवेलच्या चिंध्रण गावात राहणार्‍या शरद पाटील याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर 10-12 दिवसांतच अस्मिताचा पती आणि तिच्या सासूने अस्मिताला छळण्यास सुरुवात केली. ते तिला घरकाम करण्यावरुन सतत घालून पाडून बोलून मारहाण करत होते. तसेच अस्मिताने माहेरुन सोन्याची चेन घेण्यासाठी पैसे आणावेत यासाठी तिला वारंवार त्रास देत होते. मात्र, अस्मिताने माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने शरद पाटील तिला मारहाण करत होता. याबाबतची माहिती अस्मिता आपल्या भावाला फोनवरुन देत होती. त्यानंतर अस्मिताचा भाऊ ज्ञानेश्‍वर चौधरी याने शरद पाटील याला अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याच्या वागण्यात काहीच फरक पडला नव्हता. त्यानंतरदेखील अस्मिताचा पती आणि सासू या दोघांकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरु होता. अस्मिताने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पनवेल तालुका पोलिसांनी मृत अस्मिताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन तिचा पती शरद पाटील आणि सासू आनंदी पाटील या दोघांविरोधात हुंडाबळीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिच्या पतीला अटक केली आहे.

Exit mobile version