कर्जतमधील उल्हास नदीत विवाहितेची उडी

| कर्जत | वार्ताहर |

कर्जतमध्ये एका विवाहित महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विजया अनिल कालुंके असे मृत महिलेचे नाव आहे. त्या कर्जत शहरातील मुद्रे येथील नेमिनाथ बिल्डिंगमध्ये राहत होत्या. सोमवारी (दि.14) त्या बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा मृतदेह पोसरी गावाजवळ उल्हास नदीच्या किनाऱ्यावर सापडला. त्या मानसिकदृष्ट्या आजारी होत्या, अशी माहिती मिळत आहे. विजया कालुंके यांच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी काही नागरिकांना उल्हास नदीच्या किनाऱ्यावर एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना मृतदेहाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया कालुंके सोमवारी घराबाहेर पडल्या होत्या. त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी कर्जत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. कालुंके कुटुंबीय मूळचं सातारा जिल्ह्यातील कराड येथील आहेत. ते मागील 25 वर्षांपासून कर्जतमध्ये राहत आहेत. विजया यांना पती आणि मुलगा आहे. पोलिसांनी प्राथमिक माहितीमध्ये, विजया मानसिक दृष्ट्या कमजोर होत्या. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. मृतदेह नेमका कुठून वाहत आला, आत्महत्या नेमकी कधी आणि कशी झाली याचा तपास पोलीस करत आहेत. विवाहितेच्या अशा मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version