रुपेश पाटील यांच्या मनमानी कारभाराचा निषेध
| उरण | वार्ताहर |
उरण विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सर्वत्र जोरात प्रचार सुरू असताना शिवसेना शिंदे गटात पदाधिकार्यांमध्ये जोरदार संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी रुपेश पाटील यांच्या एकतर्फी, मनमानी व हुकूमशाही कारभाराला कंटाळून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले.
शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांना विश्वासात न घेता सर्व व्यवहार चालू असल्याने रुपेश पाटील यांच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करत उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. यामध्ये कृष्णा बा. पाटील, राजन श. म्हात्रे- संपर्क प्रमुख उलवे, भरत देशमुख- उलवे शहर प्रमुख, अमित कमळाकर ठाकूर उपतालुका प्रमुख उरण तालुका, प्रभाकर पाटील – विभागीय प्रमुख गव्हाण (उलवे), विजय पाटील विभाग प्रमुख चिरनेर, सचिन पाटील समन्वयक उरण तालुका, अनंता गडकरी शाखा प्रमुख बामण डोंगरी, संतोष मोकल शाखा प्रमुख तरघर, सचिन देशमुख शाखा प्रमुख खारकोपर, ज्ञानेश्वर पाटील शाखा प्रमुख मोरावे, रामदास पाटील संघटक वहाळ ग्रामपंचायत, धनंजय कोळी मोहा शाखा प्रमुख, अतिष ठाकूर शाखा प्रमुख उलवे सेक्टर 19, प्रसाद पाटील शाखा प्रमुख उलवे सेक्टर 5/6, सुरेंद्र ठाकूर जसखार शाखा प्रमुख यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा दिला आहे.
गेली दोन वर्षे आम्ही सर्व पदाधिकारी व शिवसैनिक युवासेना नेते रूपेश पाटील यांच्या येथील भयानक राजनीतीने बाधित होतो. वरिष्ठ पातळीवर पाटील यांच्या संघटनेला बाधक व विनाशकारी ठरणार्या कृतीबाबत अनेक वेळा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे आम्ही शिवसेनेचा व शिवसेना पदांचा सामूहिकरित्या राजीनामा देत आहोत, अशी माहिती कृष्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिंदे गटाच्या या राजीनाम्यांमुळे महायुतीच्या उमेदवाराला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.