। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत विधानसभा मतदारसंघात आ. शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिल्याने त्यांच्या समर्थकांनी शिवसेना पक्षचे पदाधिकारी म्हणून असलेल्या पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्शवभूमीवर शिवसेना पक्षकडून देखील रिक्त होणार्या पदांवर नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्याचे सत्र कर्जत विधानसभा मतदारसंघात सुरू केले आहे. दरम्यान, चार प्रमुख पदाधिकारी यांची नियुक्ती शिवसेनेकडून करण्यात आली असून आगामी काळात प्रत्येक रिक्त पदांवर नवीन कार्यकर्त्यांची नावे पाठवावी आणि त्यांनतर त्यांची पदाधिकारी यांची नियुक्ती केली जाईल असे आश्वासन पक्षप्रमुखांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आहेत.
त्यामुळे लागलीच कर्जत विधानसभा क्षेत्रातील तीन प्रमुख पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.त्यात कर्जत विधानसभा क्षेत्रातील संघटक म्हणून जिल्हा सल्लागार भरत भगत यांची तर या मतदासंघाचे संपर्क प्रमुख खालापूर येथील कार्यकर्ते भाई शिंदे यांची नियुक्ती केली आहे. कर्जत तालुका शिवसेनेचे संघटक म्हणून उपतालुका प्रमुख बाबू घारे यांची निवड करण्यात आली आहे.