नसबंदी करण्याची मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्याकडून नागरिकांना, महिलांना तसेच लहान मुलांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नेरळ विभागात प्राधान्याने ‘श्वान नसबंदी कार्यक्रम’ राबवण्यात यावा, अशी मागणी रायगड जिल्हा परिषद सदस्या सुनिता मोरे यांनी केली आहे.
सुनीता मोरे यांनी या संदर्भात त्यांनी कृषी व पशुसंवर्धन विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबागचे सभापती वैकुंठ पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे मागणी केली. दिलेल्या निवेदनात मोरे यांनी नमूद केले आहे की, नेरळ हा भाग सेंट्रल रेल्वेच्या जवळ असल्याने येथे वेगाने नागरीकरण झाले आहे. परिणामी ग्रामपंचायत हद्दीत भटक्या श्वानांची संख्या वाढली असून कुत्रा चावण्याच्या तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा मोठा फटका स्थानिक नागरिक, महिला आणि लहान मुलांना बसत आहे.
दरम्यान यावर योग्य आणि प्रभावी बंदोबस्त म्हणजे पशुसंवर्धन विभागामार्फत श्वान नसबंदी प्रक्रिया राबवणे हाच उपाय आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने नेरळ ग्रामपंचायत क्षेत्रात ही योजना प्राधान्याने आणि तातडीने राबवावी. या संपूर्ण प्रक्रियेसाठी नेरळ ग्रामपंचायतीकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. यावेळी निवेदन सादर करताना रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि कृषी सभापती वैकुंठ पाटील उपस्थित होते.







