| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माणगाव फाटा ते आंबिवली फाटक आणि पुढे बोरलेपर्यंतच्या पेशवाई रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असले, तरी आंबिवलीजवळील सुमारे 200 मीटरचा रस्ता अद्याप अपूर्ण राहिल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काँक्रीटीकरणाचे काम रखडल्यामुळे या भागात मोठमोठे खड्डे पडले असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एमएसआयडीसी विभागामार्फत या रस्त्याचे काम सुरू आहे. कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील माणगाव फाट्यापासून रेल्वे फाटक आणि पुढे भास्कर व्हॅली प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. कर्जत-कल्याण मार्गावरून माणगाव फाट्यापासून सुरू होणारा नेरळ-भीमाशंकर रस्ता बोरले येथे जोडला जातो. नेरळ गावाला वळसा घालून थेट बाहेर पडण्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अनेक वर्षांनंतर या रस्त्याचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाल्याने वाहनचालकांमध्ये समाधान होते. मात्र, आंबिवलीजवळील सुमारे 200 मीटरचा भाग अद्याप काँक्रीटीकरणाविना आहे. या ठिकाणी रस्त्यावरील डांबर काढून बाजूला टाकण्यात आले असून, काम अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आले आहे. परिणामी पावसामुळे या भागात असंख्य खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कडेला असलेली साईड पट्टीही अर्धवट असल्याने वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांची अवस्था इतकी बिकट आहे की, रस्त्यावर जणू रांगोळीच काढल्याचे चित्र दिसत आहे. खड्डे चुकवताना वाहनचालकांना रस्त्याच्या कडेने वाहने न्यावी लागत आहेत. मागील दोन महिन्यांत काही वाहने रस्त्याच्या कडेने नेताना घसरून खाली जाण्याच्या घटना घडल्याचे वाहनचालकांनी सांगितले. त्यामुळे हा अर्धवट रस्ता वाहनचालक यांच्यासाठी धोकादायक आणि परीक्षा पाहणारा ठरत आहे. बांधकाम विभागाकडून वाहनचालक यांची गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि वाहनचालक यांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहनचालक
करीत आहेत.






