| मुंबई | प्रतिनिधी |
कर्णधार हार्दिक पांड्याच्या ट्रेडची चर्चा सुरू असताना मुंबई इंडियन्सने शनिवारी (दि.22) मोठी घोषणा केली. मुंबईचे माजी फलंदाज व क्रिकेट प्रशासक झुबीन भरुचा यांची मुंबई इंडियन्स संघाच्या डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्सपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भरुचा हे मुंबई इंडियन्सच्या जागतिक नेटवर्कमधील विविध विभागांमधील नेतृत्व आणि सपोर्ट स्टाफसोबत एकत्र काम करतील. खेळाडूंच्या विकासाची आणि कामगिरीतील सातत्याची परंपरा अधिक मजबूत करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल. झुबीन भरुचा यांच्याकडे उच्च-स्तरीय क्रिकेट प्रशासनाचा दोन दशकांचा अनुभव आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्सचे टीम डायरेक्टर आणि क्रिकेट ऑपरेशन्स प्रमुख (2008-2025) म्हणून काम पाहिले आहे, तसेच दिल्ली डेअरडेव्हिल्सचे टेक्निकल डायरेक्टर (2016-2017) म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. सलामीवीर म्हणून भरुचा यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. 1993-94 च्या रणजी ट्रॉफी आणि 1994-95 च्या इराणी कप विजेत्या मुंबई संघाचे ते सदस्य होते.







