| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर आवर्जून भेट द्यायला हवी ती ताम्हिणी घाटाला. पावसाळ्यात इथल्या टेकड्या कात टाकतात.
ह्यावर्षी जुलै महिन्यात पाऊस जोरात झाल्याने घाटातील 2 रस्ते वाहून गेले. रस्त्याचे काम सुरु असताना 1 महिना घाट बंद असल्याने पर्यटक नाराज होते. परंतु, घाट सुरु झाल्याने आज रविवारी पर्यटकांनी एकच गर्दी केली. जड वाहनांना बंदी असल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने पर्यटक खुश आहेत. वृक्ष करडा रंग टाकून हिरव्यागार शाली पांघरतात. इथे मुळशी धरणाचा नयनरम्य देखावाही बघायला मिळतो आणि या छोट्याशा वर्षासहलीला नदीतील साहसी खेळांची जोडही देता येते. ताम्हिणी घाटात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागते. कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला की, डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे. थोड्या चढावरून पुढे गेले की, एखाद्या स्वप्नांच्या दुनियेतच आल्यासारखे वाटते. लांबच लांब पसरलेले हिरवेगार मखमली गालिचे, ओथंबून खाली आलेले काळे ढग, खळाळणारे निर्झर धबधबे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. पावसाळ्यात तयार होणारे इथले पाण्याचे काही प्रवाह शांतपणे डोंगरावरून खाली येतात तर काही धबधबे डोंगरावरून अक्षरश: कोसळत खाली येतात. तिथून उसळून पुढे वाहणारे हे पाणी बघायला पर्यटक इथे गर्दी करतात. घाटातल्या वळणा वळणावर नयनरम्य, विहंगम देखावे जणू काही आपली वाटच पाहात असतात. पावसाळी धुक्यात जणू काही डोकी हरवलेल्या टेकड्या आकाशात उंच झेपावत आहेत, असे वाटते. टेकड्यांच्या या भल्या-थोरल्या भतीवर अलगद उतरणारे ढग वातावरण भारावून टाकतात.






