| गांधीनगर | वृत्तसंस्था |
गुजरातच्या बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी (दि.1) सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. कारखान्यात असलेल्या बॉयलरचा स्फोट झाला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. स्फोट झाला तेव्हा कारखान्यात 30 कामगार काम करत होते. स्फोटाचा आवाज ऐकताच आसपासचे लोक कारखान्याजवळ पोहोचले. तेव्हा कारखान्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. याची माहिती लगेच एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. अनेक जखमी कामगारांना वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. स्फोट इतका शक्तिशाली होता की कारखान्याचा स्लॅब कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, बनासकांठातील डीसा भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसर हादरुन गेला आहे. या स्फोटात 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात अनेक जण अजूनही बेपत्ता असून बचाव कार्य सुरू आहे. फटाक्यांच्या कारखान्यात आग कशी लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. बनासकांठा येथील डीसा जीआयडीसीमध्ये असलेल्या दीपक ट्रेडर्स नावाच्या कारखान्यात भीषण आग लागली. या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दीपक ट्रेडर्स नावाच्या कारखान्याच्या इमारतीत फटाक्यांचे गोदाम होते. या कारखान्याचा मालक दीपक खुबचंद फरार आहे.