पळस्पे फाटा येथे गोडाऊनला भीषण आग

। पनवेल । प्रतिनिधी ।

नवीन पनवेल अग्निशमन केंद्राला रविवारी (दि. ३) पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास पळस्पे फाटा परिसरातील मारुती सुझुकी शोरूमजवळ तसेच मॅरेथॉन बिल्डिंग शेजारी मुरलीधर इंडस्ट्रीज येथील गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळाली. तत्काळ वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले.

अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्यावर गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागलेली असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कळंबोली व ओल्ड पनवेल अग्निशमन केंद्राची अतिरिक्त मदत मागविण्यात आली. अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग पूर्णपणे विझविण्यात यश आले. त्यानंतर कुलिंग ऑपरेशनही करण्यात आले. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात किराणा माल साठवलेला असल्याने जेसीबीच्या मदतीने माल बाजूला काढून काही प्रमाणात चांगला माल वाचविण्यात आला. मात्र, आगीत गोडाऊन पूर्णतः जळून खाक झाले. या कारवाईवेळी उप अग्निशमन अधिकारी अतुल सपकाळ व प्र.अ. विमोचक विकास पालवे उपस्थित होते. गोडाऊनचे मालक विवेक भटरे, परेश केशवजी करावा व राजेंद्र सिंग अशी नावे असून, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Exit mobile version