| मुंबई | प्रतिनिधी |
ईडीचे ऑफिस असलेल्या मुंबईतील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये ईडी कार्यालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांना आग लागण्याचा धोका आहे. रविवारी (दि.27) पहाटे 2.30 वाजता मुंबईतील बेलार्ड इस्टेट येथील कैसर-ए-हिंद इमारतीत भीषण आग लागली. याच इमारतीत ईडीचे ऑफिस आहे. ऑफिसमध्ये अनेक नेते आणि व्यापाऱ्यांविरुद्धची महत्त्वाची कागदपत्रे आहेत. ग्रँड हॉटेलजवळील इमारतीत आग लागल्याची माहिती अग्निशामन विभागाला मिळाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहापेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सकाळी 3.30 वाजेपर्यंत आग लेव्हल-2 च्या गंभीर श्रेणीपर्यंत पोहोचली होती. आग इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत पसरल्याचे चित्र होते. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन दलाच्या आठ गाड्या, सहा टँकर, वॉटर टॉवर टेंडर, एक श्वासयंत्र व्हॅन, एक बचाव व्हॅन, एक त्वरित प्रतिसाद वाहन आणि 108 रुग्णवाहिका घटनास्थळी होती. अग्निशमन दलाने पाच ते सहा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळले. ईडी कार्यालयातील कागदपत्रांचे नुकसान झाले की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बेलार्ड इस्टेट येथे लागलेल्या आगीमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. ईडीच्या तपासाशी संबंधित कागदपत्रे कार्यालयात आहेत. राजकीयदृष्ट्या संवेदनशील कागदपत्रे असल्याने या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनेच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. आग कशी लागली, याबाबत अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून याचा तपास करण्यात येत आहे. इमारतीच्या वरच्या भागातून अजूनही धूर येत असल्याचे दिसून येत आहे. सध्या या आगीमुळे कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.