| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील वांद्रे परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूमच्या इमारतीत आज मंगळवारी (दि. 29)पहाटे चार वाजता भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर परिसरात पोहचला आहे. आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त अद्याप नाही. ही आग इतकी भीषण होती की, आगीत मॉलमध्ये असलेले शेकडो दुकाने जळून खाक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे वांद्रे पश्चिम परिसरातील लिंकिंग रोडवरील एका बहुमजली इमारतीत आग लागली. वांद्रे येथे असलेल्या लिंक स्केअर मालमधील क्रोमा शोरुमला ही आग लागली. बेसमेंटमध्ये ही आग लागल्यानंतर ती तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली. आगीमुळे या भागातील रस्ते बंद करण्यात आले. सकाळचे आठ वाजले तरी आग नियंत्रणात आली नाही. यामुळे आग विझवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून रोबोटिक मशीनचा वापर करण्यात आला. घटनास्थळी शेकडो अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यासह एनडीआरची टीम देखील दाखल झाली आहे. अग्निशमन दलाची यंत्रणा कर्मचाऱ्यांना वापरता येत नसल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. सध्या आपला माल वाचवण्यासाठी दुकानदार जीवाची बाजी लावत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस पथक आणि अग्निशमन दलाच्या 15 गाड्या आणि इतर अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. रोबोटीक मशीन आणली गेली आहे. ज्या ठिकाणी अग्नीशमन दल पोहचू शकत नाही, त्याठिकाणी रोबोटीक मशीन वापरल्या जात आहेत.
वांद्रे भागातील लिंकिंग परिसरात ही आग लागली. आग सकाळी चार वाजता लागली तेव्हा पोलीस किंवा अग्नीशमन दलाचे अधिकारी आले नसल्याचा आरोप मॉलचे मालक सिद्दीकी यांनी केला आहे. ते म्हणाले की, सकाळी सहा वाजता आग विझवण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे आग वाढली. आगीचे धुराचे लोट दुरवर पसरल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या आगीत कोट्यावधींचे नुकसानीचा अंदाज आहे. दरम्यान, गेल्या सात तासांपासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. मात्र, अद्याप (दुपारी १ वाजेपर्यंत) अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
मुंबईत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरुमला भीषण आग
