भिवंडीतील परफ्यूम कंपनीच्या गोदामाला भीषण आग

| ठाणे | प्रतिनिधी |

मुंबई – नाशिक महामार्गालगत भिवंडी तालुक्यातील येवई गावच्या हद्दीत आर. के. लॉजिस्टिक गोदाम संकुलात आज बुधवार (दि.19) पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या भीषण आगीत तीन कंपन्यांची गोदामे जळून खाक झाली आहेत. आग मोठ्या प्रमाणात पसरली असून, त्यावर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. आगीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

बॅकारोझ परफ्युम्स अँड ब्युटी प्रोडक्ट्स, इंटरक्राफ्ट ट्रेडिंग आणि फ्रेगरन्स शॉप या कंपन्यांच्या गोदामांचे या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी आठ तास उलटूनही आग आटोक्यात आलेली नाही. भिवंडी अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. परंतु, आगीचे धुराचे लोट तब्बल दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून दिसत आहेत. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून, या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही दहा ते बारा तासांचा वेळ लागू शकतो.

Exit mobile version