। पनवेल । प्रतिनिधी ।
उलवे सेक्टर 8 परिसरात शुक्रवारी (दि. 21) पहाटेच्या सुमारास सिलेंडरचा प्रचंड स्फोट होऊन अनधिकृत धाब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, धाब्याचे सर्व साहित्य, साहित्यसाठा आणि संरचना पूर्णपणे जळून खाक झाली असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अवैधरित्या उभारण्यात आलेल्या या धाब्यात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि काही क्षणांतच संपूर्ण धाबा ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी सापडला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसताच रहिवाशांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळविले. सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मोठ्या आगीशी झुंज देत सुमारे अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग नेमकी कशामुळे भडकली याबाबत प्राथमिक तपासात गॅस सिलेंडरचा स्फोट हेच मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर धाबा पूर्णपणे अनधिकृत असल्याचे स्थानिकांनी सांगितले असून, या घटनेनंतर राजकीय स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनावर जोरदार टीका केली. सिडकोच्या जमिनीवर अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या या धाब्यामुळे शेजारील सोसायटींच्या नागरिकांचे जीव धोक्यात आले. अशा बेकायदेशीर बांधकामांवर तात्काळ गुन्हा दखल करावा,” अशी मागणी त्यांनी केली. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा अनधिकृत धाब्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.







