| मुंबई | प्रतिनिधी |
कुर्ला येथील कुरेशी नगर परिसरातील काही झोपड्यांना शुक्रवारी (दि.9) पहाटे भीषण आग लागली. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र आगीत आठ झोपड्या जळून खाक झाल्या. दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
कुर्ला माहुल रेल्वे रुळालगत झोपडपट्टी उभी राहिली असून या झोपडपट्टीतील काही झोपड्यांना शुक्रवारी पहाटे 5 च्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
स्थानिक रहिवाशांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र आग अधिकच भडकत गेली. काही नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत अन्य काही झोपड्यांपर्यंत आग पसरली होती.