। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील बिरवाडी बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत प्रसिद्ध ‘अजय टेलर’ यांचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अचानक दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळातच आगीने संपूर्ण दुकानाला वेढा दिला. या आगीत ग्राहकांनी शिवण्यासाठी दिलेले कपडे, नवीन कापडाचा साठा, शिलाई मशीन तसेच इतर साहित्य जळून भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीच्या प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणली. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मेहनती व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत.







