कोलाडचा डोंगर वणव्याने होरपळतोय

वनसंपदेची प्रचंड हानी, वनखात्याचे दुर्लक्ष

| कोलाड | वार्ताहर |

गेली तीन चार दिवसापासून प्रचंड लावण्यात आलेल्या वणव्यामुळे रोहा तालुक्यातील कोलाड(आंबेवाडीचा) डोंगर अक्षरशः वणव्यामुळे होरपळत आहे. सतत लावण्यात वणव्यामुळे वनसंपदेची मोठी हानी होत असुन यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांचा जीव तुटत आहे. तर हाकेच्या अंतरावर असणार्‍या वनखात्याला याचे काहीही वाटत नसल्याने एकंदरीत परिस्थितीवरुन दिसत आहे.

माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी अनादीकाळापासून वृक्षाची अक्षरशः कत्तलच चालवली आहे. सध्याच्या आधुनिकेतेच्या व तंत्रज्ञानाच्या युगात औद्योगिकरण व नागरिकीकरणाच्या नावाखाली जंगलच्या जंगले भुईसपाट होतांना दिसत आहेत. त्यामुळे अगोदर पर्यावरणाचे संतुलन पार बिघडले आहे. त्यातच भरीतभर म्हणून ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वणव्यामुळे अधिकच भर पडत आहे.

दरवर्षी मार्च महिना उजाडल्यावर वणवा लावण्याचे प्रमाण मोठे दिसून आहे. वनवे लावण्यावर कोणाचाही अंकुश नसल्याने व कायदयाचा धोका नसल्याने वणवा लावणार्‍यांचे फावत आहे. शिकार करणे, वृक्षतोड करणे, वनसंपदा मिळवणे तसेच, सरपणासाठी लागणारा लाकूडफाटा अशा विविध कामासाठी वणवे लावले जात असले तरी ते कायद्याच्या चौकटी बाहेरचे आहे. परंतु वनखाते पुर्णपणे उदासीन दिसून येत आहे. कारण वनसंपदेची प्रचंड हानी करणार्‍या या वणवे लावणार्‍यांवर कधीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.

तालुक्यातील विपुल वनसंपदा लाभलेल्या मोजक्याच जंगलामध्ये कोलाड आंबेवाडी येथील जंगलाचा समावेश होतो, तर हा डोंगर मुंबई-गोवा हायवेलगत असलेल्या विपुल वनसंपदेमुळे येणार्‍या जाणार्‍या प्रवाश्यांचे सहज लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे वनसंपदेबरोबर प्राण्यांच्या वास्तव्यावरदेखील गदा येताना दिसत आहे. एवढे सर्व होऊन हि वनखाते निद्रावस्तेत दिसत आहे.

Exit mobile version