। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या डोंगरावर वसलेल्या पर्यटन स्थळावर पावसाळ्यात झाडे कोसळण्याची आणि जमिनीचे भुस्खनन आदी संशय आणि दरडी कोसळण्याच्या घटना सतत घडत असतात. त्यात वीजवाहिन्या झाडांच्या फांद्यांसोबत जमिनीवर कोसळत असतात आणि त्यात घोड्यांचे अपघात देखील होत असतात.त्या सर्व आपत्कालीन घटनांवर तात्काळ कार्यवाही करता यावी आणि स्थानिकांना कमी प्रमाणात त्याची झळ बसावी आणि येथील पर्यटन सुखरूप पणे पार पडावे यासाठी माथेरान नगरपरिषद मध्ये आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.दरम्यान,माथेरान गिरीस्थन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी 24 तास हा कक्षा कार्यन्वीत ठेवण्यावर भर दिला आहे.
माथेरानची भौगोलिक पारिस्थिती लक्षात घेऊन मान्सून आणि आपत्तीच्या काळी सर्वांना घडणार्या घटनांची माहिती मिळावी आणि त्यावर तात्काळ कार्यवाही करता यावी यासाठी माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेने आपत्कालीन कक्ष कार्यान्वित केला आहे. माथेरान गिरीस्थान नगरपरिषद ने तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखडा नुसार मान्सून पूर्व नालेसफाई ची कामे, बंधारे बांधण्याची कामे पूर्ण झाली असून, लोकवास्तीच्या ठिकाणच्या फेवर ब्लॉक वर ब्लिचिंग पावडर मारण्यास सुरुवात केली आहे.तसेच पालिकेच्या रुग्णालयात अत्यावश्यक वस्तू, अत्यावशक औषधें यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.
तात्पुरते निवारे
आपत्कालीन काळात कड्याच्या जवळ राहणार्या नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. सतत पाऊस सुरु झाल्यास त्याभागात लोकांनी जवळील समाजमंदिर शाळा आणि कम्युनिटी सेंटर येथे त्यांच्या तात्पुरत्या निवांर्याची सोय करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
माथेरान मध्ये पाऊस सतत कोसळत असेल तर नेहमी आपत्तीची स्थिती निर्माण होते.त्यासाठी आम्ही आपत्ती व्यवस्थापन आराखडा नुसार नियोजन केले असून आपण स्वतः जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणार आहोत,त्याचवेळी आपतकालीन कक्ष देखील 24 तास कार्यन्वित असणार आहे. आपत्तीची माहिती देण्यासाठी मात्र सर्वांनी जागरूक राहुल पालिकेला सहकार्य करावे हे आवाहन करीत आहे.
सुरेखा भणगे-मुख्याधिकारी