| नेरळ | प्रतिनिधी |
पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि बाजारपेठेतील दुकानदार त्रस्त होते. दरम्यान, नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या प्रयत्नांतून तीन नवीन वीज रोहित्र माथेरानसाठी मंजूर झाली होती. आता ही सर्व रोहित्र माथेरान शहारत बसवून कार्यान्वित करण्यात आली असून, शहरातील विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
माथेरानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा प्रश्न नागरिकांना आणि व्यावसायिकांना चांगलाच सतावत होता. कधी कमी दाब, तर कधी अचानक वीज गायब. त्यात विजेचा वाढत्या भारामुळे नागरिकांसह व्यापारीही अक्षरशः हैराण झाले होते. या समस्येबाबत नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्याकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. अखेर त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून महावितरणकडे पाठपुरावा केला होता. शहरातील श्रीराम चौकातील डीपीवर यापूर्वी 200 केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर होता. मात्र, त्यावर क्षमतेपेक्षा जास्त भार येत असल्याने मुख्य बाजारपेठेत कमी दाबाने वीजपुरवठा होत होता. वारंवार फ्यूज उडणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकारही घडत होते. ही समस्या दूर करण्यासाठी आता त्याच ठिकाणी अतिरिक्त 100 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसवून 650 मीटरची नवीन केबल टाकून दोनस्वतंत्र सर्किट तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे विजेच्या भाराचे विभाजन होऊन मुख्य बाजारपेठेतील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या कामासाठी पनवेल विभागाचे कार्यकारी अभियंता दिवाकर देशमुख यांचे सहकार्य लाभले असून महावितरणचे उप अभियंता मोतीराम राख, सहाय्यक अभियंता बजरंग उंबरकर यांनी माथेरानमध्ये ते नवीन वीज रोहित्र आणून बसवून घेतले आहेत.
माथेरान शहर वीज संपन्न… कमी दाबाचा प्रश्न मिटला .. तीन नवीन रोहित्र बसवले
