| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील बोरगाव गावातील विजेचे रोहित्र 22 एप्रिल रोजी बिघाड झाल्याने येथील ग्रामस्थ अंधारात आहेत. अवकाळी पाऊस यामुळे विजा कडकडत होत्या आणि त्यावेळी वीज रोहित्र बंद झाले.
कळंब परिसरातील बोरगाव गावात 200हून अधिक घरे असून, या गावातील रहिवाशी यांना विजेचा पुरवठा व्हावा यासाठी 100 केव्हीए क्षमतेचे वीज रोहित्र बसवले आहे. हे वीज रोहित्र 22 एप्रिल रोजी अवकाळी पावसासोबत असलेल्या विजांचा कडकडाटामुळे जळाले आहे. त्या दिवसापासून विजेचा पुरवठा खंडित झाला असून, सध्याच्या प्रचंड उष्मा लक्षात घेऊन बोरगाव ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ग्रामस्थांनी लवकरात लवकर वीज रोहित्र मिळावे यासाठी महावितरण कंपनीचे कर्जत येथील कार्यालयात जाऊन निवेदन दिले. बोरगाव ग्रामस्थ यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे. गेली तीन दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने तेथील ग्रामस्थांना उकाड्याचा प्रचंड त्रास होत असून, अवकाळी पाऊस झाल्यानंतर वातावरणात देखील उकडा वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आज तिसऱ्या दिवशी कर्जत येथील महावितरण कार्यालयात जाऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. महावितरणचे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी ग्रामस्थांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळी कोणत्याही स्थितीत वीज रोहित्र आणून बसवले जाईल असे आश्वासन दिले आहे.







