स्वच्छता अभियानात माथेरान शहर चकाचक

| माथेरान | वार्ताहर |

शहरामध्ये फक्त सुशोभिकरण नव्हे तर शहरामध्ये सातत्याने स्वछता असणे आवश्यक असून, स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध ठिकाणी दि.6 रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या अभियानात माथेरान नगरपालिकेनेदेखील सहभाग नोंदवून मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अहिल्याबाई होळकर चौक ते इंदिरा गांधीनगर आणि वे साईट हॉटेलपर्यंतचा रस्ता आणि रेल्वे ट्रॅकवरील कचरा उचलण्यात आला. यात रस्त्यात पडलेली झाडे, गटारत पडलेल्या बाटल्या काढून गटारे साफ करण्यात आली. यावेळी एकूण एक टन कचरा सुमारे 50 कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने उचलून शहर स्वच्छ करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या बिव्हिजि कंपनीला घनकचरा व्यवस्थापन ठेका देण्यात आला आहे, ते कार्यरत आहेत की नाही की उगाच नगरपरिषदेच्या पैशाचा अपव्यय होत आहे, असे स्थानिक बोलत आहेत.

या स्वच्छता अभियानात नगरपरिषदेचे अधिकारी स्वच्छता निरीक्षक नरेंद्र सावंत, वरिष्ठ लिपिक प्रवीण सुर्वे, कर विभागप्रमुख सदानंद इंगळे, अजय साळुंखे, जयवंत वर्तक, अमित भस्मा, ज्ञानेश्वर सदगीर यांच्यासह सर्व सफाई कामगार उपस्थित होते.

Exit mobile version