माथेरानच्या विकासाला पाहीजे राजकीय पाठबळ

| माथेरान | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील एक टुमदार पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची जगभर ओळख आहे. या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असतात. परंतु, जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे नेहमीच दुर्लक्ष होत असते. यासाठी सामूहीक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

माथेरानची लोकसंख्या 4393 इतकी असून एकूण मतदार संख्या ही जेमतेम तीन हजारांच्या आसपास आहे. त्यातच सहा ते सात पक्षांचे अस्तित्व काहीशा प्रमाणात आजही टिकून आहे. त्यामुळे विधानसभा असो किंवा लोकसभेच्या निवडणूका असोत आपल्या पक्षाला सातशे ते आठशे मते मिळणार म्हणून इकडे संबंधीत उमेदवार कधीही फिरकत नाहीत. निवडणूक काळात आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून उडता उडताच प्रचार केला जातो. आजही हे सुंदर ठिकाण सोयीसुविधापासून अन्य स्थळांच्या तुलनेत खूपच पिछाडीवर पडलेले आहे. एकविसाव्या शतकात वाटचाल होत असताना देखील इथे अद्यापही दळणवळण सुविधा कार्यान्वित नाहीत. एकमेव नेरळ माथेरान या मार्गावरून सर्व वाहतूक व्यवस्था आजमितीपर्यंत सुरू असल्याने ऐन सुट्ट्यांच्या हंगामात मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर वाहनांची तोबा गर्दी होते. तर घाटरस्ता पूर्णपणे कोंडीत अडकून जातो. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना प्रवास करणे खूपच त्रासदायक बनते. महाबळेश्वर सारख्या ठिकाणी चोहोबाजूंनी पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे तिथे पर्यटकांचा भरणा मोठया प्रमाणात असतो. माथेरानमध्ये वाहतुकीची सुविधा नसल्याने येथे एक दिवसीय पर्यटनसाठी पर्यटक येत असतात. त्यामुळे येथील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांच्या व्यवसायाला भरभराट येत नाही.

माथेरानचा शोध ब्रिटीश काळात ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर ह्युज मॅलेट यांनी लावला होता. त्यावेळी रामबाग पॉईंटमार्गे सर्व वाहतूक सुरू होती. हा एक ऐतिहासिक रस्ता असून पॉईंटच्या पायथ्याशी असलेल्या गावापर्यंत मोटार वाहन येते. मास्टर प्लॅनमध्ये या रस्त्याची नोंद आहे. तर पनवेल-धोदाणी-मार्गे माथेरान या रस्त्याचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. तो रस्ता सुध्दा आजही लाल फितीत अडकून पडला आहे. त्याचप्रमाणे धोदाणी-मार्गे माथेरान फिनिक्युलर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण होऊन काही वर्षे लोटली आहेत. काही राजकीय नेत्यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला निव्वळ स्वःताच्या स्वार्थासाठी खोडा घातला होता. अशा पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यास खऱ्या अर्थाने माथेरानचे नंदनवन होऊन इथल्या पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.

Exit mobile version