यंदाच्या हिवाळ्यात माथेरान गारठले

पर्यटकांसह स्थानिकांनीही घेतला गुलाबी थंडीचा अनुभव पारा 13 अंशावर

| नेरळ | वार्ताहर |

माथेरानमध्ये पर्यटन हंगामातील सर्वात थंडगार दिवस म्हणून गुरुवारी(दि. 18) नोंद झाली. 18 जानेवारी रोजी माथेरानचे तापमान 13.0 अंश इतके खाली आले. दरम्यान,दोन वर्षांपूर्वी 24 जानेवारी रोजी 07.06 अंश सेल्सिअस एवढा खाली पारा आला होता. गतवर्षी 14 जानेवारी रोजी माथेरानचे हवामान 11.06 अंश इतके खाली आले होते. माथेरान मध्ये गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटक येत असतात आणि त्यामुळे माथेरानमधील पर्यटन वाढीसाठी थंडीची चाहूल आणि माथेरान गारठणे ही सुचिन्ह समजली जात आहेत.

माथेरान हे 2636 फुट उंचावर असलेले ब्रिटिशांनी शोधून काढलेले पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाणी मुंबई- पुण्यापासून जवळचे पर्यटनस्थळ असून घनदाट झाडी आणि जंगलाने व्यपालेले हे पर्यटनस्थळ अधिकच खुलून दिसते. यामध्ये दिवसागणिक येथील तापमानाचा पारा खाली येऊ लागला आहे. दरम्यान या वर्षातील हे कमी तापमान असल्याचे माथेरान नगरपरिषदेचे कर्मचारी अन्सार महापुळे सांगतात. सध्याची कडाक्याच्या गुलाबी थंडीचा अनुभव घेतला आणि पारा आणखी खाली येईल अशी शक्यता असल्याने पर्यटक माथेरानला येतच आहेत. 18 जानेवारी 2023 रोजी माथेरानचे हवामान एवढे थंड होते कि पारा इतका खाली आला की भर उन्हात सुद्धा थंडी जाणवत होती. सकाळपासून थंडीचा जोर होता तो संध्याकाळपर्यंत वाढतच गेला. त्यात विकेंड असल्याने पर्यटकांसह स्थानिकांनीही या गुलाबी कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतला.

तापमान
माथेरानच्या इतिहासातील सर्वात जास्त थंडी 2022 मध्ये 24 जानेवारी रोजी होती. त्यावेळी पारा तब्बल 07.06 अंश इतका खाली आला होता. तर 2022 मध्येच 10 जानेवारी रोजी 10.06 अंश तर 9 जानेवारी 2022 रोजी 13.06 अंश आणि 2 डिसेंबर 2021 रोजी पारा 14.08 अंश इतका खाली आला होता. 16 जानेवारी रोजी माथेरानचा पारा 14 अंश इतका खाली आला होता. तर 17 जानेवारी रोजी हा पारा 13.06 अंश होता आणि 18 जानेवारी रोजी हा पारा 13.0 अंशावर होता.

माथेरानची थंडी आम्ही पूर्वीपासून अनुभवली आहे. मात्र आता तापमान मोजण्याची यंत्रणा कार्यान्वित झाल्याने पारा खाली गेला आहे हे माहिती पडू लागले आहे. त्याचा फायदा पर्यटक वाढीसाठी होणार आहे.

अनिस शेख
व्यवसायिक
Exit mobile version