दलालांच्या फसवणुकीतून पर्यटकांची सुटका; नगरपरिषदेकडून पर्यटनविषयक अॅपचा शुभारंभ
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानला आलेल्या पर्यटकांची फसवणूक होते असे सातत्याने बोलले जाते. त्यात पर्यटक प्रवासी कर भरण्यासाठी आल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास दलाल आणि गाईड यांच्यात अडकून बसतो. त्यामुळे पर्यटकांना हक्काच्या आणि इच्छित स्थळी जाता यावे, अशी माहिती देणारे अॅप माथेरान गिरिस्थान नगरपरिषद कडून विकसित करण्यात आले आहे. दरम्यान, अनंत चतुर्दशीपासून माथेरानमध्ये प्रवास करताना पर्यटकांनी प्रवासी स्वच्छता कर भरल्यानंतर डिजिटल पावती दिली जाईल आणि त्या पावतीवर क्यू आर कोड आपल्या मोबाईलवरून स्कॅन केल्यास माथेरानची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी पहिली डिजिटल पावती घेत पालिकेच्या प्रवासी कर संकलन मोहिमेचा शुभारंभ केला.
माथेरान या गिरिस्थान नगरपरिषद हद्दीत कोणताही कारखाना नाही आणि त्यामुळे या पर्यटन स्थळी येणारे पर्यटक यांच्याकडून प्रवासी कराच्या रूपाने स्वच्छता कर वसूल केला जातो. त्या प्रवासी कराच्या माध्यमातून पालिकेचा आर्थिक गाडा चालत असून, पालिकेच्या या आर्थिक नियोजनमधून कोणीही पर्यटक जाऊ नये आणि त्यामुळे पालिकेचे नुकसान होऊ नये यासाठी माथेरान पालिकेने आपल्या कर संकलन सेवेचे डिजिटलायझेशन केले आहे. माथेरानमध्ये प्रवेश करणार्या अनेक पर्यटक यांना माथेरानविषयी माहिती नसते आणि त्यामुळे दस्तुरी नाका येथे पर्यटकांना रूम पाहिजे, घोडा पाहिजे, फिरायचे आहे का? असे विचारणारे असंख्य लोक समोर दिसतात. त्यामुळे पर्यटकांचा गोंधळ उडत असतो, त्याबद्दल सातत्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे पालिकेने आपल्या प्रवासी कर सेवेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. एक एप्रिल रोजी पालिकेने कर संकलनचा ताबा घेतला आणि त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात पालिकेने मुख्याधिकारी सुरेख भणगे यांच्या माध्यमातून आणि संकल्पनेतून प्रवासी कर पावती ऑनलाईन उपलब्ध झाली आहे.
यासाठी पालिकेने एक या सॉफ्टवेअर तयार केले असून डिजिटल प्रणालीमुळे आता या करात कायमस्वरूपी अधिक विश्वासार्हता आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आहे.गेल्या काही वर्षातील पर्यटकांची माथेरानला येणार्या संख्येतील वाढ, तसेच कोणत्या दिवशी किती पर्यटक आले याची सर्व नागरिकांना, पर्यटकांना डिजिटल डिस्पलेद्वारे माहितीदेखील मिळणार आहे. ज्यात पालिकेची माहिती असून, इतर माहिती सतत अपडेट करण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार आहे. पर्यटकांनी तिकीटमध्ये बारकोड दिला असून, त्याद्वारे एका क्लिकवर ऑफिसिअल सर्व माहिती नागरिकांना उपलब्ध होऊ शकते.
काय आहे बार कोडमध्ये?
माथेरानमध्ये आल्यानंतर प्रवासी कर डिजिटल पावतीवर असलेले बार कोड स्कॅन केले की संपूर्ण माथेरान त्या पर्यटकांच्या मोबाईलमध्ये दिसणार आहे. त्या अॅपच्या सहाय्याने पर्यटकाला कुठे जायचे आहे? कोणत्या हॉटेलमध्ये किंवा प्रेक्षणीय स्थळी कोणता रस्ता जातो या सर्वांची इत्यंभूत माहिती मिळू शकणार आहे.