माथेरानला पर्यटकांची पसंती

पर्यावरणपूरक रस्ते, वाहतुकीचे पर्याय उपलब्ध झाल्याने पर्यटनात वाढ
व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण

| माथेरान | वार्ताहर |
माथेरानच्या प्रेक्षणीय पॉईंटचा जांभ्या दगडांमध्ये तयार करण्यात आलेला परिसर आणि क्ले पेव्हर ब्लॉकने तयार केलेले मुख्य रस्ते, इथल्या सर्वच आबालवृद्धांची आवडती मिनिट्रेन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रदूषणमुक्त सुखकर असा सुरू झालेला ई-रिक्षाचा प्रवास अशा अनेक महत्त्वाच्या बाबींमुळे माथेरानच्या पर्यटनात पर्यटकांची रेलचेल वाढली असून, आत्ता येथे दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत.

उंच उंच झाडांनी नटलेले आणि घनदाट जंगलाने व्यापलेले माथ्यावरील रान म्हणजेच माथेरान मुंबई व पुणे या मोठ्या शहरांच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेले हे पर्यटनस्थळ मागील काळात काही ठराविक मौसमातच पर्यटन हंगामाने फुलायचे. त्यावेळी दिवाळी, नाताळ आणि एप्रिल, मे महिन्यांच्या सुट्टीत येथे पर्यटन हंगाम होत होता. बाकीच्या वेळेत तर फारच तुरळक पर्यटक येथे येत असत. पावसाळ्यात तर येथील मोठं मोठे हॉटेल व्यावसायिक हे आपली हॉटेल पूर्णतः बंद करून मुंबईला आपल्या राहत्या घराकडे निघून जात होते. येथील स्थानिक मंडळी मात्र येथे काहीतरी मोलमजुरी करून येथेच वास्तव्यात राहात होती.

काही काळा नंतर पर्यटक वर्षासहलीसाठी पावसात मस्त मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडू लागली आणि माथेरानच्या पावसाळी वर्षा पर्यटनाला खरी सुरवात झाली. वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी आणि या इथल्या धुक्याच्या दुलईत न्हाऊन निघण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर माथेरानमध्ये येऊ लागले. आणि आत्ता बाराही महिने येथे पर्यटक हंगाम सुरू झाला असून येथील चित्र पूर्णपणे बदललेले दिसत आहे. याठिकाणी होत असलेल्या नवनवीन बदलांमुळे पर्यावरणपूरक क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांमुळे, येथे पुन्हा सुरू झालेल्या नेरळ-माथेरान मिनिट्रेनमुळे व कर्जत ते माथेरान सुरू झालेल्या मिनीबस सेवेमुळे आणि बॅटरीवर चालणार्‍या पर्यावरणपूरक ई-रिक्षामुळे येणार्‍या पर्यटकांना वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांची रेलचेल अधिक वाढली असून, यामध्ये आत्ता मधल्या दिवसांत तर येथे हजारोंच्या संख्येने पर्यटक माथेरानमध्ये दाखल होत आहेत. यामुळे येथील व्यवसायसुद्धा तेजीत येत असून, या दररोजच्या वाढत्या पर्यटकांमुळे छोटे-मोठे व्यावसायिक पण समाधान व्यक्त करीत आहेत.

माथेरानमध्ये आता पूर्वीसारखा काळ राहिलेला नसून, वाहतुकीचे नवनवीन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. आत्ता लवकरच येथे रोप-वे प्रकल्प व फिन्यूक्युलर ट्रेनचा प्रकल्प सुरू झाल्यास माथेरान हे सुंदर पर्यटनस्थळ जगाच्या नकाशावर दिसेल. – राजेश चौधरी, अध्यक्ष, माथेरान व्यापारी वेल्फेअर असोसिएशन

Exit mobile version