ई-रिक्षांत वाढ करण्याची मागणी
। माथेरान । वार्ताहर ।
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली आहे. परंतु, वाहतुकीच्या गहन समस्यांना सामोरे जात प्रवास करावा लागत असल्यामुळे लवाजम्यासह आलेल्या पर्यटकांची त्रेधातिरपीट उडत आहे.
ई-रिक्षाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कधी नव्हे एवढी पर्यटकांची गर्दी याठिकाणी पाहायला मिळत आहे. ई-रिक्षाच्या स्टँडवर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ई-रिक्षा संघटना उत्तम प्रकारे सेवा देत आहेत. विशेष म्हणजे या ई-रिक्षाच्या स्वस्त आणि सुरक्षित सेवेचा लाभ घेण्यासाठी पर्यटक सुद्धा आपला अमूल्य वेळ खर्च करून ताटकळत उभे राहून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत.
तसेच, या सेवेचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला असून फक्त 20 रिक्षांच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देणे चालकांना त्रासदायक बनले आहे. संघटनेची त्यांच्या हक्काची उर्वरीत एकूण 74 बाकी असलेल्या ई-रिक्षांची मागणी आहे. या सर्व रिक्षा उपलब्ध झाल्यास सर्वाना प्रवास सुखकर होणार असून यापुढेही इथे मोठ्या प्रमाणावर पर्यटन क्रांती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमच्यासाठी ई-रिक्षांची सुविधा ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. परंतु, येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात, तर 20 रिक्षा खूपच कमी आहेत. सरकारने या ठिकाणी अजूनही रिक्षांना प्राधान्य दिले तर आमचा वेळ वाचेल आणि पर्यटक जास्त प्रमाणात येतील. त्यामुळे इथल्या गोरगरिबांना रोजगार देखील मिळेल.
निरंजन हातनोलकर,
पर्यटक मुंबई
गर्दीच्या वेळी पर्यटकांना ई-रिक्षाच्या रांगेचे नियोजन मी निस्वार्थीपणे करीत असतो. ई-रिक्षाची संख्या कमी असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांना तासनतास ई-रिक्षाची वाट पहावी लागते. तसेच, पायलट प्रोजेक्टचा कालावधी देखील पूर्ण झाला असून सनियंत्रण समितीने ई-रिक्षांची संख्या वाढवावी.
जनार्दन पार्टे,
सामाजिक कार्यकर्ते, माथेरान