वसंत ऋतुमधील निसर्गाचे रूप ठरतेय आकर्षण
। माथेरान । वार्ताहर ।
निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी प्रत्येक ऋतूत निसर्ग आपली किमया दाखवत आहे. त्यात शिशिर ऋतूमध्ये पानगळती होऊन वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटून निसर्गाचे नवीन रूप, येथील निसर्गाची अद्भुत लीलया, वसंत ऋतुमधील नैसर्गिक रंगपंचमीच्या छटा, रंगांची उधळण ही नयनरम्य दृश्य येथे आलेल्या पर्यटकांना अनुभवयास मिळणार आहे.
माथेरान हे निसर्गाने नटलेले पर्यटनस्थळ असून येथे सर्व ऋतूत नयनरम्य देखावे आणि निसर्गाची वेगवेगळी रूपे येथे पहावयास मिळतात. पळस फुलतो काटेसावर बहरतो मोगर्याची फुले येथील निसर्गाच्या श्रुंगारात भर टाकतात आणि सुरू होतो तो निसर्गाचा रंगोत्सव. या रंगोत्सवात वसंत ऋतूत झाडाला येणारी नवीन पालवी ही पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरत असते. पानगळती झालेल्या पाल्यापाचोळ्यातून चालताना कडक पाला तुटण्याचा होणारा आवाज यामुळे पर्यटक अगदी आनंदी होतात. तर करंज, आंबा, कोलारा या झाडांना आलेल्या नवीन पालवीवर सूर्यकिरणे पडल्यावर पालवी चमकताना दिसते हे खरे पर्यटकांना आकर्षित करतात.
या ऋतूत माथेरानच्या डोंगर शिवरामध्ये अनेक वृक्ष सुध्दा आपल्या पूर्ण फुलांनी आपला अवतार बदलतात व हिरव्यागार झाडांमधून कोवळी पालवी धारण करून रंगीबिरंगी छटा आपल्या नजरेस पडतात. आज पानझड तर उद्या गुलाबी कोवळी पाने आणि नंतर गडद लाल पाने आणि पुढे आणखीन एक एक दिवस रंग बदलून पुन्हा आपल्या हिरव्या रंगाकडे मार्गक्रमण करत पाने आपली पूर्ववस्था धारण करतात. हा प्रवास निसर्ग प्रेमींसाठी पर्वणी आणि नजरेस सुखावणारा आहे. हा वसंत ऋतू पक्षांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा महिना पक्षांच्या मनोमिलनाचा असतो. त्यामुळे येथील ह्या निसर्गात सकाळ पासून बुलबुल, कोळीला, साळुंकी, कूटरुक आणि स्वर्गीय नर्तक ह्या पक्षांचा किलबिलाट ऐकावयास मिळतो आणि हे सुंदर चित्र कोणत्याही शहरामध्ये पहावयास मिळत नाही.हे फक्त माथेरान मध्येच पहावयास मिळते.यामुळे निसर्गप्रेमी पर्यटक या महिन्यातच माथेरानला भेट देतात.







