वनविभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष?
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान डोंगर भागात धुळवड साजरी होत असताना सायंकाळच्या सुमारास त्या ठिकाणी वणवा लागण्याची घटना घडली होती. या वणव्याची माहिती वन विभागाला देऊन सुद्धा वन कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले नाहीत. त्या वणव्याची व्याप्ती कमी करण्यासाठी स्थानिक आदिवासी लोकांनी प्रयत्न केले; मात्र, अपुऱ्या साधन सामुग्री मुळे वणवा विझविण्यात त्यांना यश आले नाही. परिणामी वणवा रात्रभर पेटत राहिला आणि माथेरान डोंगर होरपळून निघाला.
जिल्ह्यात मंगळवारी (दि.3) धुळवड सण साजरा होत असताना माथेरानच्या डोंगर रांगेत असलेल्या आदिवासी वाड्यांच्या वरच्या भागात वणवा लागला. संध्याकाळच्या वेळी लागलेल्या वणव्याची माहिती समाज माध्यमांवर पसरल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची शोधाशोध झाली. काहींनी वन अधिकारी, कर्मचारी यांना संपर्क देखील केला. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही वणवा विझवण्यासाठी घटनास्थळी पोहचले नाही. हा वणवा विझविण्यासाठी स्थानिक पातळीवर बेकरे वाडी, आसल वाडी तसेच धनगर वाड्यांमधील आदिवासी लोकांनी झाडाच्या फांद्या तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोंगराळ भागात सुकलेले गवत अधिक प्रमाणात असल्याने आगीचे लोळ वाढत होते आणि त्यामुळे वणवा विझवण्यात त्यांना अपयश आले. तसेच, वन कर्मचारी यांच्याकडून जंगल भागात जाळपट्टे मारण्यात आले नव्हते. त्यामुळे हा वणवा वाढत गेला.
यादरम्यान, समाज माध्यमांवर वन अधिकारी, कर्मचारी यांची मदत होईल, असे मेसेज फिरत होते. मात्र, वन विभागाने कोणतेही सहकार्य केले नाही. तसेच, वन विभागाकडे असलेले आग विझवण्याचे मशीन देखील उपलब्ध झाले नाही. त्यामुळे माथेरान डोंगरावरील वणवा विझवता आली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे बेकरे वाडी भागात सुरुवातीला लागलेला वणव्याचा भडका पुढे आसल वाडीपासून चिंच वाडी, सागाची वाडी असा पुढे पुढे गेला.







