। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या गिरिस्थानावरील सर्वात सुंदर प्रेक्षणीय स्थळ म्हणून पॅनोरमा पॉईंटची ओळख आहे. या नामशेष झालेल्या प्रेक्षणीय स्थळाकडे जाणारे रस्ते, पथदिवे आणि सुशोभीकरण करून या प्रेक्षणीय स्थळाचे पुनर्रजीवन करण्यात आले होते. मात्र, आताच्या घडीला पॅनोरमा पॉईंटकडे जाणारा रस्ता झाडाझुडपात हरवला आहे. माथेरान पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून पर्यटकांना या पॉईंटकडे जाण्यासाठी गैरसोय होत आहे.
पॅनोरमा पॉईंट माथेरानच्या पूर्वेला असून भीमाशंकरच्या डोंगरातून वर येणार्या सूर्याच्या पहिल्या किरणांचे दर्शन या पॉईंट वरून घेता येते. लालभडक सूर्याचे आगमन पाहण्यासाठी अभ्यासू पॅनोरमा पॉईंटला भेटी देत असतात. यामुळे या पॉईंटला सनराईज पॉईंट या नावाने देखील ओळखले जाते. दस्तुरी येथील पॅनोरमाकडे जाणारा बारमुख रोडवर असलेले हे प्रेक्षणीय माथेरानच्या उत्तर दिशेच्या टोकावरील एक पॉईंट असून येथून 360 अंशाच्या कोनातून सह्याद्रीच्या डोंगर शिखराचे निसर्गरम्य नयनमनोहर दृश्य पाहता येते. याला ‘पॅनोर्यामिक व्हूव’ असे म्हणतात. यामुळे याला ‘पॅनोरमा पॉइण्ट’ असे नाव पडले आहे. दस्तुरी परिसरातील वाहनतळ येथून जवळ असलेल्या पॅनोरमा पॉईंट हा माथेरानच्या डोंगरावरील जिरेटोप समजाला जातो. दर्दी पर्यटकांसाठी हा पॉईंट महत्वाचा आहे. परंतु, या पावसाळ्यात पॅनोरमा रस्त्यावर गावत उगवले असून झाडेझुडपे देखील रस्त्यावर आली आहेत. अशा पॅनोरमा पॉईंटकडे जाणारा रस्ता माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या दुर्लक्षपणामुळे बंद झाला आहे.