माथेरान पालिकेची मिनीबस सेवा; नेरळ- दस्तुरी नाका दरम्यान धावणार

| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटन स्थळी पर्यटकांना अल्प दरात नेण्यासाठी माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेने दस्तूरी नाका- नेरळ या मार्गावर मिनीबस सेवा सुरू करण्याची परवानगी मागितली होती.राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मिनीबस सेवा सुरू करण्याची सशर्त परवानगी माथेरान पालिकेला दिली आहे.राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे माथेरान पालिकेच्या तत्कालिन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याकडून मिनीबस सेवेबद्दल सतत पाठपुरावा सुरू होता आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
माथेरान गिरिस्थन नगरपरिषद मध्ये तत्कालीन थेट नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव घेवून पालिकेला मिनीबस सेवा सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करणारा ठराव केला होता. त्यानंतर तत्कालीन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी राज्याचे मुख्ममंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना भेटून ही मागणी केली होती.त्यानंतर मुख्यमंत्री यांच्याकडून परिवहन मंत्री अनिल परब यांना सूचना केल्या होत्या.त्यानुसार परिवहन मंत्री यांनी नेरळ माथेरान घाटरस्ता मजबूत करून घेण्यासाठी शासनाने मागील दीड वर्षे प्रयत्न केले.त्यानंतर शासनाने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण मधून घाटरस्ता मजबूत आणि रुंद करून झाल्यानंतर हा रस्ता पालिकेची परिवहन सेवा सुरू करण्यासाठी योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आणि त्यानंतर राज्य परिवहन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष आणि राज्याचे परिवहन मंत्री यांच्या बैठकीत माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेची मिनीबस सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
नऊ किलोमीटर लांबीच्या अंतरावर नेरळ रेल्वे स्टेशन ते माथेरानचा दस्तुरी नाका या दरम्यान ही मिनीबस सेवा माथेरान पालिकेकडून चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.त्याबद्दल माथेरान पालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले.माथेरान मध्ये येणारे सर्वसामान्य पर्यटक यांच्यासाठी माथेरान पालिकेची ही मिनीबस सेवा मदतगार ठरणार आहे.पर्यटकांना अल्प दरात माथेरान मध्ये जाता येणार आहे.त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Exit mobile version