माथेरान पावसाळी पर्यटन हंगामासाठी सज्ज

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान मधील उन्हाळी पर्यटन हंगाम आत्ता हळूहळू संपत आला असून आत्ता लवकरच येथे पावसाळी पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. यासाठी येथील दुकानदार, व्यावसायिकदार तसेच आपत्ती व्यवस्थापन केंद्र सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. माथेरान मधील उन्हाळी पर्यटन हंगामाचा हा शेवटचा आठवडा असून यापुढे येथील पावसाळी पर्यटन सुरू होणार आहे. पावसाळ्यात देखील येथे शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. येथे डोंगरदार्‍यांमध्ये ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे इथला ओला चिंब निसर्ग आणि पावसाळी धुक्यातून रस्त्याने वाट शोधत जाताना पर्यटकांच्या होणार्‍या मज्जा मस्ती तसेच कधी कधी तर कोसळणार्‍या जोरदार पावसाने येणार्‍या पर्यटकांची उडणारी त्रेधातिरपीट अश्या अनेक गोष्टींनमुळे माथेरानचे पावसाळी पर्यटन खुलून दिसते. त्याचबरोबर प्रत्येक पॉईंटवर जाऊन तिथे पसरलेल्या धुक्यातून थोडा फार दिसणारा निसर्ग न्याहाळणे आणि पावसाळी थंडीत गरमागरम कांदाभजी, मक्याचे कणीस आणि आल्याचा चहा याचा आस्वाद घेणे याची मज्जा तर काही औरच असते.


माथेरानमधील पावसाळी पर्यटन हंगामात पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील शारलोट तलाव ओव्हरफ्लो झाल्यावर या तलावाचा ओसंडून वाहणारा धबधबा. या धबधब्यावर येणारा प्रेत्येक पर्यटक हा येथे मनसोक्तपणे भिजण्याची आनंद घेत असतो. यामध्ये महिला, पुरुष व लहान मुलांसह सगळेच येथे या वॉटरफॉलची मजा घेताना दिसतात. येथे पडणार्‍या मुसळधार पावसात सुद्धा अनेक पर्यटक घोड्यावर रपेट मारल्याशिवाय परत जात नाहीत आणि माथेरानची मिनिट्रेन देखील दस्तुरी जवळ असलेले अमन लॉज स्टेशन ते माथेरान स्टेशन दरम्यान पर्यटकांना शटल सेवा देत असते. माथेरान मध्ये पावसाळ्यात निसर्गाची वेगवेगळी रूपे पाहण्यास पर्यटक आवर्जून या पर्यटन स्थळाला भेट देत असतो.यामुळेच आत्ता पर्यटकांबरोबर माथेरानकरांना देखील पावसाळी पर्यटनाची ओढ लागली असून येथील सर्वच माथेरानकर पुढील पावसाळी पर्यटनाची तयारी करताना दिसत आहेत.

Exit mobile version