तांत्रिक समितीच्या अहवालाला सनियंत्रण समितीची मान्यता
| माथेरान | वार्ताहर |
माथेरान सनियंत्रण समितीची 12 वी बैठक नुकतीच अलिबाग येथे पार पडली. अध्यक्ष के.पी. बक्षी, सदस्य सचिव जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उप वनसंरक्षक व समितीचे इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राकेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीने तयार केलेल्या क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्याच्या अहवालाला समितीने मान्यता दिल्याने हा अहवाल कोर्टाला सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे माथेरानची रस्त्याची रखडलेली कामे मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. माथेरानमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तसेच माथेरान नगरपरिषद, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण माथेरान पोलीस स्टेशन यांना आवश्यक ती अवजड वाहने मर्यादित कालावधीसाठी परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी रायगड यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सनियंत्रण समितीने घेतला. या निर्णयाची माहिती सर्वोच्च न्यायालयात देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
सनियंत्रण समितीमध्ये माथेरानच्या विकासाचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येतात. मात्र या समितीवर स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्याने स्थानिकांच्या मागण्या समितीपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे या समितीवर नगराध्यक्ष व स्थानिक आमदार यांचा समावेश करण्याची मागणी आ. महेंद्र थोरवे यांनी केली. त्यांच्या निवेदनावर निर्णय घेण्याची जबाबदारी पर्यावरण प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्याकडे देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यामुळे लवकरच माथेरानमधील क्ले पेव्हर ब्लॉक्स रस्त्यांची कामे प्रगतीपथावर येतील, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक करीत आहेत.