माथेरान टू कतार…जाणून घ्या घोडेस्वाराचा यशस्वी प्रवास

। माथेरान । संतोष खाडे ।
माथेरान येथील युवकाने माथेरानचा झेंडा अटकेपार लावला असून कतार या देशामध्ये झालेल्या आंतराष्ट्रीय अश्‍व शर्यतीमध्ये (hourse race) सर्व घोडेस्वारांमध्ये अव्वल येण्याचा मान त्याने पटकावला आहे. नुकत्याच झालेल्या अंतरराष्ट्रीय अश्‍व शर्यतीमध्ये प्रकाश आखाडे या युवकाने कतारमधील अश्‍व शर्यतीमध्ये भाग घेतला होता.

एका गरीब कुटूंबात जन्माला आलेला मुलगा, त्याच्या लहानपणापासून अठराविश्‍व दारिद्र्य त्याच्या नशिबी होते. मागासलेल्या गावामध्ये शाळा, दवाखाना आदी सुविधांचा अभाव, इतकेच काय तर गावात जायला साधा रस्ताही नाही, अशा गावात जन्माला आलेला प्रकाश आखाडे आपल्या हिम्मत आणि मेहनतीच्या जोरावर माथेरानमध्ये घोडा व्यवसाय करीत होता. माथेरानमध्ये फिरावयास आलेल्या एका घोडा मालकाने त्याची घोडेस्वारी, कला, हुन्नर पाहुन त्याला मुंबईमध्ये नेले.

मुंबई येथील महालक्ष्मी रेसकोर्समध्ये (Mahalaxhmi race course) तो घोड्याची कामे करू लागला. घोड्यावर बसणे, सकाळी ट्रॅकमध्ये घोडा पळविण्याची कामे करू लागला. इमानेइतबारे काम करत राहिल्यानंतर काही वर्षांनी त्याला घोडेस्वारीचा परवाना मिळाला आणि मग त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

मुंबई आणि पुण्यात रेसकोर्समध्ये चांगली घोडेस्वारी करत काही रेस जिंकत त्याने लोकांची मने जिंकली. इमानदारीने कार्य पार पाडत त्याने प्रशिक्षक आणि मालकांची मने जिंकली. प्रकाश हा गरीब घरात जन्माला आलेला असल्याने इमानदारी काय असते हे त्याला माहित होतं. या इमानदारीच्या जोरावर मुंबईमध्ये नावलौकिक कमावल्यावर त्याला कतार या देशात जाण्याचा योग आला.तिथे गेल्यावर त्याने आपले कसब दाखविले.

नुकत्याच कतार येथे झालेल्या अश्‍वशर्यतींमध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील त्याने पहिली रेस जिंकून माथेरानचा झेंडा अटकेपार फडकवला. या घोडेस्वाराची माथेरानमध्ये सर्व स्तरातून वाह..वाह होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शैलेश शिंदे, माजी अध्यक्ष, स्थानिक अश्‍वपाल संघटना

Exit mobile version